मुंबई – ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. एका सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवीगाळ केल्याने दत्ता दळवी आज सकाळी अटक करण्यात आली आहे. भांडूप पोलिस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत पोलिस स्टेशनमध्ये पोहचले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
भांडूप मध्ये रविवार (दिनांक 26 नोव्हेंबर) शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केले होते.
याप्रकरणी भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले की, “मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिासंनी घरात घुसून अटक केली. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या जनभवाना भांडूपमधील मेळाव्यात व्यक्त केल्या होत्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्यासोबत असणारे गद्दार हृदय सम्राट आहेत, ते स्वत:ला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतात. हा वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही, तर एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. ते वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची उपाधी स्वत:ला लावून घेतात.”
पुढे ते म्हणाले, “दळवी यांनी काय चुकीचे म्हटले? त्यांनी वापरलेला भोसxx हा शब्द धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेंच्या तोंडी घातलेला आहे. सेन्सॉरने तो काढला नाही. धर्मवीर चित्रपटात आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द तसाच्या तसा आहे. जर तो शब्द आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, प्रायोजक, कलाकार यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केला का? तो शब्द दत्ता दळवी यांनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते.”