महाळुंगे- महाळुंगे इंगळे तालुका खेड येथील भर लोकवस्तीत असलेल्या एका बालाजी इंटरप्राईजेस नावाच्या रबर पॅकेजिंग कंपनीला आज पहाटे चार वाजता अचानक आग लागण्याचा प्रकार काही स्थानिक रहिवाशांनी पाहिला व तात्काळ माळुंगे पोलिसांना याची खबर दिली.
पोलीस हवालदार राहुल मिसाळ ,पप्पू लोखंडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सतर्कता दाखवत अग्निशमन विभागाला माहिती कळवली अग्निशमन दल एमआयडीसी अग्निशमन दल महिंद्रा कंपनी यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
तसेच गावातील सतर्क नागरिक यांनीदेखील पाण्याचे टॅंकर आणून आग विझवण्यासाठी हातभार लावला. टँकर मालक अतुल भोसले यांनी देखील आपला टॅंकर आणून आग विझवण्यासाठी मदत केली. एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले तोपर्यंत कंपनीतील सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा माल आगीत जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.