एमबीए सीईटीची परीक्षा लांबणीवर!

दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेबाबत अद्याप सूचना नाही

पुणे – राज्य सीईटी सेलमार्फत दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणाऱ्या राज्यातील एमबीए प्रवेश परीक्षेबाबत अजून कोणतीही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा ती कधी होणार, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला आहे. पदवी परीक्षांचे निकाल लांबल्यामुळे परीक्षेची तारीखही उशीरा ठरविली जाणार असल्याचे दिसून येत आहे.

करोनामुळे पदवीचे प्रवेश गेल्यावर्षी उशिराने झाले. त्यामुळे पदवीचे निकाल सर्वच विद्यापीठांचे पुढे गेले. यामुळे आता राज्यात दरवर्षी मार्चमध्ये एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमबीए-एमएमएस सीईटीची अद्याप तारीख ठरलेली नाही. करोना प्रादुर्भावामुळे प्रवेश रखडले आहेत. याचाच परिणाम यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिसून येत आहे.

दरम्यान, गतवर्षी एमबीएची प्रवेश परीक्षा 14 आणि 15 मार्च रोजी राज्यातील 148 केंद्रावर घेण्यात आली. राज्यभरातून 1 लाख 10 हजार 631 विद्यार्थ्यांनी ती दिली होती. या सीईटीच्या माध्यमातून एमबीए अभ्यासक्रमांच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या महाविद्यालयातील सुमारे 37 हजार जागांवर प्रवेश पूर्ण केले जातात. गतवर्षी सीईटीनंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

करोनामुळे प्रवेश उशिरा झाले होते. यंदा पदवी परीक्षा अद्याप होणे बाकी आहे. तसेच सर्वच विद्यापीठात पदवी प्रवेश उशिरा झाल्याने परीक्षांची तयारी आता सुरू आहे. परीक्षेनंतर निकाल जाहीर होण्यास विलंब होणार असल्याने एमबीए सीईटीही लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

“एमएचटी-सीईटी’च्या प्रतिक्षेत विद्यार्थी
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्‍यक असणारी “एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेची अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही. दरवर्षी या महिन्यात या सीईटीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार विद्यार्थी सीईटीची तयारी करतात. यंदा करोनामुळे या परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

ऑनलाइन परीक्षा व्हावी…
पदवी प्रवेशाची अट असल्याने बहुसंख्य विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र ठरतात. त्यामुळे हे निकाल जाहीर होण्याअगोदर प्रवेश परीक्षांची तारीख जाहीर करणे योग्य ठरणार नसल्याचे राज्य सीईटी सेलचे म्हणणे आहे. मात्र पदवी परीक्षेला पात्र उमेदवारही ही परीक्षा देऊ शकतो. यामुळे प्रवेश परीक्षा कक्षाने तारीख जाहीर करावी व ऑनलाइन परीक्षा घ्यावी, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.