धुळे – देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत आहे. असे असताना आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चार ते पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव चौफुली येथे झाला आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी बस चालकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघाताबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला इंदोरच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्तावरील एका विद्यूत पोलला जाऊन धडकला या अपघातात ट्रकच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलिसांनी धाव घेतली व मदत कार्य चालू केले. जखमी प्रवाशांना तात्काळ जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे.