लखनौ – आम्ही उत्तरप्रदेशातल्या निवडणुकीत महिलांसाठी स्वतंत्र जाहीनामा प्रसारीत करणार आहोत, या जाहीरनाम्याचा मसुदा आम्ही तयार केला आहे असे कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. जर आपला पक्ष सत्तेत आला तर सरकारी बसेस मधून महिलांना मोफत प्रवास, मोफत गॅस सिलिंडर अशी आश्वासने यात देण्यात आली आहेत. या निवडणुकीत महिलांना चाळीस टक्के तिकीटे दिली जातील अशी घोषणा प्रियांका गांधी यांनी या आधीच केली आहे.
एका ट्विटर संदेशात त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, उत्तरप्रदेशातील महिलांसाठी प्रत्येक दिवस हा संघर्षाचा दिवस असतो, त्यांच्या वेदना आपण जाणतो. त्यामुळेच महिलांची गरज लक्षात घेऊन आम्ही महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसारीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलिंडर्स दिले जातील अशी माहितीही त्यांनी यात दिली.
आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महा दहा हजार रूपयांचे वेतन दिले जाईल, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना चाळीस टक्के आरक्षण दिले जाईल, विधवांनी एक हजार रूपयांची पेन्शन दिली जाईल, महिलांसाठी राज्यात 75 कौशल्य विकास शाळा काढल्या जातील अशा घोषणा यात करण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींना इलेक्ट्रीक दुचाकी आणि स्मार्ट फोन देण्याची घोषणा त्यांनी या आधीच केली आहे.