बुलडाणा – 40 ते 45 जणांच्या एका जमावाने वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात घडली असून जमावाच्या तावडीतून सुटण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला हवेत गोळीबार करावा लागला आहे.
अधिकाऱ्याने हेवेत तीन फेरी झाडल्यामुळे हल्लेखोर पसार झाले आणि त्यांच्या तावडातून वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांची सुटका झाली. याप्रकरणी मेंढपाळांच्या गटाविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभयारण्यात काही मेंढपाळ बेकायदेशीरपणे मेंढ्या चारायला येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि काही कर्मचारी वन क्षेत्रात गस्त घालत होते. दरम्यान पिंपळगाव नाथ भागात काहीजण बेकायदेशीरपणे मेंढ्या चारताना आढळले असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले. यातून त्यांच्यात वादावादी झाल्यानंतर मेढपाळांनी लाठ्याकाठ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे समजल्यावर नपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी हवेत तीन फैरी झाडल्या. पुढील तपास पोलीस करत आहेत.