थेऊर- कोलवडी (ता. हवेली) येथील विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन यांनी रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे मूळ मालकास परत केल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. कोलवडी सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब गायकवाड हे आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असताना घराकडून निघाले असता त्यांना कोलवडी केसनंद रस्त्यावर पाकीट सापडले. त्यांनी ही माहिती आपल्या मित्रांना कळवली.
त्या पाकिटामध्ये दहा हजार रुपये रोख व इतर महत्वाची कागदपत्रे होती. त्यांनी मंगेश गायकवाड, दत्ता उंद्रे, म्हस्कू गायकवाड या मित्रांच्या मदतीने कागदपत्रांच्या आधारे मूळ मालकाचा शोध घेतला. त्यांना सापडलेली रोख रक्कम व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात दिली. त्यामुळे परिसरातून चेअरमन व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.