हैदराबाद: तेलंगणात आज राज्य स्थापनेचा दिन होता. 2014 साली याच दिवशी हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले होते. हा दिवस आज राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यासाठी मोठ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली नव्हती.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा हुतात्मा स्मारकावर जाऊन पुष्पचक्र वाहिले त्यानंतर प्रगती भवनवर ध्वजारोहणाचा सरकारी कार्यक्रम झाला. त्यानंतर केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील अन्य सरकारी मुख्यालयांमध्येही यानिमित्त अत्यंत साधेपणाने ध्वजारोहणाचे कार्यक्रम करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.