Telangana Election 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजपने मध्य प्रदेशात 150 चा आकडा पार केला आहे आणि राजस्थानमध्येही बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. छत्तीसगडमध्येही भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेस प्रचंड बहुमताने विजयी होताना दिसत आहे.
तेलंगणामध्ये सध्या मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या काही तासानंतर काँग्रेस मोठी आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसने भक्कम आघाडी घेऊन बहुमताचे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत, 119 जागांच्या तेलंगणा विधानसभेत काँग्रेस 63 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी बीआरएस 40 जागांपर्यंत मर्यादित असल्याचे दिसते. भाजप नऊ जागांवर आघाडीवर आहे, पण या दक्षिणेकडील राज्यात भाजप पक्ष पहिल्यांदाच दुहेरी अंकात जाऊ शकतो.
दरम्यान, तेलंगणाच्या निकालानंतर मंत्री आणि बीआरएस नेते केटीआर राव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे. केटीआर यांनी त्यांच्या ट्विटर (सध्याचे X) अकाउंट पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “बीआरएसला सलग दोन वेळा सरकार दिल्याबद्दल मी तेलंगणातील जनतेचा आभारी आहे. आजच्या निकालाने दु:खी नाही, पण निराश नक्कीच झालो कारण आजचा अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही. आजच्या पराभवातून धडा घेत आम्ही पुढे जाऊ आणि पुढची रणनिती ठरवू. असं म्हणत त्यांनी जनादेश जिंकल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे अभिनंदनही केले आहे.
दरम्यान, 2018 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत 119 जागांपैकी TRS (आता BRS) ने 88 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी काँग्रेसने 19, एआयएमआयएम 7, टीडीपी 2 आणि भाजप 1 जागा जिंकली होती.