हैदराबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांना आव्हान देणारे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विधानसभा निवडणुकीत आपण पैसे आणि दारू वाटणार नाही अशी शपथ घेण्यासाठी गन पार्क येथे यावे असे आव्हान रेड्डी यांनी राव यांना दिले होते आणि आपल्या समर्थकांसह बेकायदेशीरपणे गन पार्क येथे प्रवेश केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्यात आले.
गन पार्क येथे हुतात्मा स्मारक आहे. तेथे येऊन शपथ घेण्याचे आव्हान त्यांनी राव यांना दिले होते. रेड्डी यांनी पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. आचारसंहिता लागू असल्यामुळे वातावरण बिघडू नये याकरता त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रेड्डी यांच्या विरोधात कारवाई झाल्यावर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली आणि पोलीस अत्याचार थांबवण्याची मागणी केली.
भारतीय जनता पार्टी आणि भारत राष्ट्र समिती या दोन्ही पक्षांनी अगोदरच्या पोटनिवडणुका पैशाच्या बळावर जिंकण्याचा प्रयत्न केला याची तेलंगणाच्या जनतेला कल्पना आहे. मात्र असले अनैतिक प्रकार करून निवडणूक जिंकण्यात कॉंग्रेसला स्वारस्य नसल्यामुळे कॉंग्रेसने कधी असले प्रकार केले नाही. मुख्यमंत्री राव यांनीही ते पैसे किंवा दारू वाटप करणार नाहीत अशी शपथ हुतात्मा स्मारक येथे येऊन घ्यावी असे आव्हान त्याकरताच रेड्डी यांनी त्यांना दिले होते.