पुणे – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, मान्यताप्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा “एमसीक्यू’ पद्धतीने ऑनलाइन घेण्यात येणार आहे. त्याचे संभाव्य वेळापत्रक “एमएसबीटीई’ने प्रसिद्ध केले आहे.
पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाची लेखी परीक्षा 5 ते 15 ऑक्टोबरदरम्यान, तर तंत्रशिक्षणच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांची लेखी परीक्षा 25 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल 31 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे, अशी माहिती “एमएसबीटीई’चे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी गुरुवारी दिली.
“तंत्रशिक्षण’च्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरून देण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांना 40 पैकी 30 प्रश्न सोडवावे लागणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यासोबतच काही अपरीहार्य कारणास्तव विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, तर त्यांना परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच
परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांचीच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.