पुणे – नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे ऑनलाइन भाडेकरारांची (लिव्ह ऍन्ड लायसन्स) नोंदणी मागील 15 दिवसांपासून रखडली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागातील इस्टेट एजंट्स, भाडेकरार करणारे सर्व्हिस प्रोव्हाडर यांनी नवीन प्रशासकीय इमारत येथे नोंदणी महानिरीक्षक यांची भेट घेऊन त्यांच्या समोर तक्रारी मांडल्या.
राज्यभरात दररोज सुमारे अडीच ते तीन हजार भाडेकराराच्या दस्तांची नोंदणी होते. मागील महिन्यात नोंदणी विभागाच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांची नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे संपूर्ण राज्यात सुमारे सहा हजारांहून अधिक दस्तनोंदणीसाठी प्रलंबित होते. मध्यंतरी तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे काही प्रमाणात प्रलंबित दस्तांची नोंदणी टप्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली. परंतु पुन्हा सर्व्हरमध्ये अडचणी येऊ लागल्याने हे काम मागील 15 दिवसांपासून थांबले आहे. त्याचा फटका बसत आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, नागपूर, मुंबई, ठाणे, बदलापूर आणि नाशिक या ठिकाणांहून सुमारे अडीचशे सर्व्हिस प्रोव्हायडर यांनी नोंदणी महानिरीक्षक यांची भेट घेतली. यावेळी असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडरचे अध्यक्ष सचिन शिंगवी, मंगेश पाटील, योगेश पंपालिया, चेतन देवरे, जितेंद्र नानकानी यादी उपस्थित होते.
मागील पंधरा दिवसांपासून भाडेकराराची वेबसाइट बंद आहे. त्यामुळे भाडेकराराची नोंदणी होत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही नोंदणी महानिरीक्षक यांची भेट घेतली. त्यांनी ही समस्या लवकरात लवकर सोडवू , असे आश्वासन दिले आहे.
– सचिन शिंगवी, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर
विविध कामे रखडली
रहिवास पुरावा, दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी, गॅस नोंदणी, पारपत्र, विवाह नोंदणी अशा विविध कारणांसाठी ऑनलाइन भाडेकरार ग्राह्य धरण्यात येतो. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज भरण्यापूर्वीचा किंवा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी भाडेकरार नोंदणीकृत असणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. मात्र, ही सर्वच प्रक्रिया रखडली आहे.