पुणे – पुण्यातील टीचर्स ट्रेनिंग ऍकॅडमीचे बांधकाम दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्याने राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी तंत्रशिक्षण, एमएसबीटीई, उच्चशिक्षण तसेच बांधकामाशी संबंधित सर्वांची झाडाझडती घेतली. त्यावेळी बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) जागेत टीचर्स ट्रेनिंग ऍकॅडमी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मॉडेल कॉलनीत सुसज्ज इमारत उभारण्यात येत आहे. मात्र, या इमारतीचे बांधकाम सहा वर्षांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे या बांधकामाचा आढावा सामंत यांनी यापूर्वी ऑगस्टमध्ये घेतला होता. त्यावेळी निम्म्याहून अधिक रक्कम देउन सुद्धा त्याप्रमाणात कामच झाले नसल्याचे दिसून आले. त्यावेळी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या बैठकीत ऍकॅडमीचे उद्घाटन 1 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात इमारतीचे अजूनही बांधकामच पूर्ण झाले नाही. त्यामुळे बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत सामंत यांनी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या इमारतीत ऍकडमी आणि राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे कार्यालय होणार आहे. सध्या एमएसबीटीईसाठी आवश्यक काम बंद असून ऍकॅडमीच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. या इमारतीत कॅन्टिन, निवासाची सोय आणि अद्ययावत स्टूडीओ तसेच परदेशी पाहूण्यांसाठी तीन व्हीव्हीआयपी रूम तयार करण्यात येणार आहे.