पुणे – लंडन किंवा युरोपीय देशांमधून आलेल्या नागरिकांनी “आरटीपीसीआर’ चाचणी करून घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे. दि.22 डिसेंबरपूर्वी युरोपमधून आलेल्या 109 प्रवाशांनी अपूर्ण माहिती दिल्यामुळे आणि चुकीचा मोबाइल नंबर दिल्यामुळे त्यांच्याशी महापालिका संपर्क करू शकली नाही. शिवाय त्यांच्या प्रवासाचा दहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधीही संपला नाही. त्यामुळे त्यांनीही महापालिकेशी संपर्क करून चाचणी करून घ्यावी, असेही महापालिकेचे आवाहन आहे.
नव्या करोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून युरोपीय देशांमधून 22 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आपली “आरटी-पीसीआर’ चाचणी करून घ्यावी असे महापालिकेने आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व प्रवाशांना यासंबंधातील मार्गदर्शक सूचना लागू आहेत.
विमानतळावरून उतरल्यानंतर त्या प्रवाशांनी जवळच्या हॉटेल्समध्ये सात दिवस क्वारंटाइन होणे आवश्यक आहे. प्रवाशांमध्ये करोनासदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांनी थेट डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. तेथे पुढील चाचण्या आणि औषधोपचार केले जाणार आहेत.
चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही पाच ते सात दिवस घरी विलगीकरण होणे अनिवार्य आहे. परंतु ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल त्यांनी त्याच हॉटेलमध्ये किंवा कोविड साठी राखीव रुग्णालयांमध्ये 14 दिवस विलगीकरण होणे आवश्यक आहे, असेही महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.