पुणे – करोना रोधक लस घेणाऱ्या व्यक्तीवर काही दुष्परिणाम दिसल्यास तातडीने रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक केंद्राजवळ असलेल्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय करण्यात येणार आहे.
करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही अप्रिय घटना घडल्यास (ऍडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायजेशन) संबंधित व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यासाठी कमला नेहरू रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि ससून रुग्णालयात व्यवस्था केली जात असून, पंधरा वॉर्डनिहाय खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. लस घेणाऱ्या व्यक्तीला काही गंभीर दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) उद्भवल्यास तातडीने या रुग्णालयांमध्ये दाखल केले जाणार आहे.
आगामी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची पहिली सिटी टास्क फोर्स बैठक महापालिकेत झाली. या बैठकीत लसीकरणाच्या नियोजनाचे सादरीकरण करताना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अन्य नियमित लसीकरणाप्रमाणेच करोना प्रतिबंधक लसीकरणानंतरही छोटे-मोठे “साइड इफेक्ट्स’ उद्भवू शकतात. त्यानुसार, महापालिकेतर्फे व्यवस्थापन केले जात आहे.
करोना प्रतिबंधक लस अद्याप निश्चित व्हायची आहे. त्यामुळे त्याचे काय “साइड इफेक्ट’ होतील, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. मात्र, “ऍडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायजेशन’साठी कमला नेहरू रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि ससून रुग्णालय निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय पंधरा वॉर्डनिहाय सरकारी, खासगी रुग्णालयेही निश्चित केली जाणार असून, त्यामध्ये “एईएफआय’ ट्रीटमेंट केली जाईल. प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर एक रुग्णवाहिका सज्ज राहणार आहे.
– डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, मनपा
अन्य देशांत छोटे-मोठे साइड इफेक्ट्स
ब्रिटन, अमेरिकेत करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून, तेथे नागरिकांना लस दिल्याच्या जागी वेदना आणि सूज याशिवाय थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, ताप, ऍलर्जी अशा छोटे-मोठे साइड इफेक्ट्स दिसून येत आहेत. मात्र, एखाद्या नागरिकाला गंभीर दुष्परिणाम झाल्यास त्याला तातडीने रुग्णवाहिकेसह वैद्यकीय उपचार देण्याचे नियोजन करण्याच्या केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहेत.