आंबेगाव तालुका पंचायत समिती घेणार पडताळणी शिबिर
मंचर- आंबेगाव तालुक्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची सेवापुस्तके पडताळणी शिबिर लवकरच होणार आहे. गटशिक्षण अधिकारी पोपटराव महाजन यांनी शिबिर घेण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनिल भेके यांनी दिली.
आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने घोडेगाव येथे आंबेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांच्याकडे तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या सेवापुस्तकातील नोंदी अद्यावत करून आंबेगाव पंचायत समिती व पुणे जिल्हा परिषदेमार्फत सेवापुस्तके पडताळणी शिबिर आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार सेवापुस्तक पडताळणी शिबीर आयोजित करणार असल्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. आंबेगाव तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी पंचायत समिती शिक्षण विभाग आणि आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांच्यामध्ये सहविचार सभेचे आयोजन आंबेगाव पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन, विस्तार अधिकारी रामदास पालेकर, अधीक्षक रामा बारगुले, वरिष्ठ सहायक रवींद्र भागवत, वरिष्ठ सहायक अविनाश घोगरे, कनिष्ठ सहायक रामदास तळपे, अर्थ विभागाचे सहायक लेखाधिकारी कैलास भालेराव, वरिष्ठ सहायक अरुण घोलप, लेखापाल प्रमोद भोजने, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष महेश बढे,आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर, नेते विजय घिसे, सरचिटणीस सुनील भेके, शंकर गवारी, प्रवक्ते नीलेश मिडगे, शिक्षक पतसंस्थेचे सभापती मंगेश जावळे, मानद सचिव संजीव ढोंगे उपस्थित होते. सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले.