सुरतमधील घटनेने देशात संतापाची लाट; पालिका आयुक्तांचे चौकशीचे आदेश
सुरत : एका धक्कादायक घटनेत सुरत महापालिकेने (एसएमसी) भरती करावयाच्या प्रशिक्षणार्थीं महिलांना एकत्र विवस्त्र करून तपासणी केल्याचे संतपाजनक वास्तव समोर आले आहे. या घटनेची माहिती समोर येताच सुरत महापालिका आयुक्त बनछानिधी पाणी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत एसएमसी कर्मचारी संघटनेने महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली.
आयुक्तांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कल्पना देसाई, महापालिका सहआयुक्त गायत्री जरीवाला आणि कार्यकारी अभियंता तृप्ती कलाथिया यांची चौकशी समिती नियुक्त केली असून समितीने 15 दिवसांत याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. प्रशिक्षण संपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी नियमानुसार आवश्यक असते. त्यानुसार काही महिला कर्मचारी सुरत महापलिका रुग्णालयात आल्या होत्या.
आम्ही या तपासणीला विरोध करत नाही. मात्र ज्या पध्दतीने या महिला कर्मचाऱ्यांची तपासणी महिला रोग विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतल्या,÷या पध्दतीला आमचा कडाडून विरोध आहे, असे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे. तपासणीसाठी एका पाठोपाठ एक महिलांना बोलावणे अपेक्षित होते. त्या ऐवजी या महिला डॉक्टरने 10 जणांचा गट बनवून त्यांना एकत्र विवस्त्र उभे केले. ही पध्दत बेकायदा आणि मानवतेच्या विरूध्द आहे. प्रत्येक महिलेची स्वतंत्र तपासणी आवश्यक होती, असे या संघटनेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
संघटनेचे सरचिटणीस अहमद पटेल यांन द्दिलेल्या माहितीनुसार, महिला प्रशिक्षणार्थी कर्मचारी अनिवार्य फिटनेस टेस्टसाठी पोहचल्यानंतर त्यांना 10 च्या गटाने उभे करण्यात आले. त्या खोलीचा दरवाजाही व्यावस्थित बंद केला नव्हता. त्यांना काही अतिखासगी प्रश्न विचारण्यात आले. यातील अविवाहित महिलांना तुम्ही कधी गर्भवती झाला होतात का? यासारखे प्रश्न विचारण्यात आले. त्यांना अशा अवघडलेल्या अवस्थेत अन्य महिलांसमोर उभे करण्यात आले. वैद्यकीय चाचणीच्या काळात महिलांचा आदर ठेवलाच पाहिजे.
दरम्यान, सुरतचे महापौर जगदिश पटेल यांनी दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. रूग्णालयाच्या नियमांनुसार महिलांची शारीरिक चाचणी अनिवार्य आहे. मात्र या तक्रारीनुसार महिला कर्मचाऱ्यांकडून असंवेदनशीलता दाखवली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, याआधी गुजरात येथील भूजमध्ये एका कॉलेजने विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्या पाठोपाठ ही घटना समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.