- दिवसभरात तीन ठिकाणी 180 शिक्षकांची घेतली चाचणी
कार्ला – कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने संपूर्ण शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले; परंतु शासनाने 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहेत. परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांच्या साह्याने संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आले आहेत.
शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व शिक्षकांची करोना चाचणी (स्वॅब) करणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने मावळ प्रशासनामार्फत शिक्षकांची लोणावळा वागाड सिनोटेरिअम 36, तळेगाव सुगी केंद्र 81 समुद्रा कॉलेज टाकवे, कार्ला येथील कोविड केअर सेंटर 63 असे आज 180 शिक्षकांची करोना चाचणी करण्यात आली.
उर्वरित शाळांसाठी पुढील काही दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. मावळ आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, मावळ समन्वयक गुणेश बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकवे समुद्रा कोविड सेंटर प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोनावने, डॉ. रमेश चव्हाण, डॉ. सीमा शिंदे, डॉ. सुहास सिंघन, डॉ. प्रियंका खराडे, डॉ. राजेश जस्वाल, प्रयोगशाळा प्रमुख माधुरी वाळुंज, आरोग्यसेवक अमोल गडमवाड, आरोग्य सेविका रमा वाघमारे, सुजाता सकट, लक्ष्मी धोत्रे, आशा भगत, वैशाली आंभोरे, अर्चना कांबळे, मेघा भरगिरे, अशिष खोब्रागडे, सीमा सोनकांबळे, रोहित हजारे, करिश्मा वाकडे यांनी चाचणी घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या वेळी मुख्याध्यापक बापूराव नवले, पांडुरंग ठाकर, गणपत कायगुडे, शहाजी लाखे यांनी शाळा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी झाली असून, शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.