मुंबई – ख्वाडा चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे नेहमीच काहीतरी हटके घेऊन येत असतात. ख्वाडा नंतर ‘बबन’ चित्रपटातून कऱ्हाडे यांनी ग्रामीण तरुणाचा प्रवास सर्वांना उलगडून सांगितला होता. ख्वाडा आणि बबनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर कऱ्हाडे यांनी आपल्या आगामी टीडीएम या चित्रपटाची घोषणा केली होती. हटके टायटल असल्यामुळे हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.
ख्वाडा आणि बबन या दोन्हही चित्रपटांमध्ये भाऊसाहेब शिंदे मुख्य भूमिकेत होता. टीडीएमचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची उत्कंठा चांगलीच वाढली होती. मात्र चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असणार हे अद्याप समजू शकलेले नाही. भाऊराव कऱ्हाडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट अनाऊन्स केली आहे.
“प्रेमाचा, लाडाचा, हसवणारा,रडवणारा, आपल्या सगळ्यांचा.. हवाहवासा टिडीएम… येत आहे आता नव्या तारखेला… २८ एप्रिल २०२३ आशीर्वाद असूद्या” अशा आशयाची पोस्ट दिग्दर्शक कऱ्हाडे यांनी केली आहे. यासोबत चित्रपटाचे पोस्टर देखील त्यांनी शेअर केले आहे.
ख्वाडा आणि बबन या चित्रपटात सामाजिक भान जपून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कऱ्हाडे यशस्वी झाले होते. त्यामुळे टीडीएमकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या आहेत. टीडीएमचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.