पुणे – नागरिकांना मिळकतर वेळेत भरता यावा, यासाठी मार्च 2023 अखेरपर्यंत सुटीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून ही माहिती देण्यात आली. महापालिकेकडून यापूर्वी केवळ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्च महिन्यात सुटीच्या दिवशी कर भरणा केंद्रे सुरू ठेवली जात होती.
महापालिकेकडून शहरातील नागरिकांना मिळकतकराची बिले आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात (एप्रिल) पाठविली जातात. तर या बिलांची दोन सहामाहित विभागनी केली जाते. त्यात पहिली सहामाही 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत असते. तर या कालावधीत नागरिकांना 31 म पर्यंत कर भरल्यास महापालिका मिळकतकराच्या सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत देते. तर 30 जूनपर्यंत कर न भरल्यास प्रत्येक महिन्यात दोन टक्के दंड आकारणी सुरू करण्यात येते. तर दुसरी सहामाही 1 ऑक्टोबर ते 31 मार्चपर्यंत असते. या कालावधीत नागरिकांनी 31 डिसेंबरपर्यंत कर न भरल्यास थकबाकीवर दोन टक्के दंड आकारला जातो. त्यामुळे वर्षाअखेरीस हा थकबाकीचा दंड 24 ते 25 टक्के होतो. त्यामुळे नागरिकांवर दोन टक्के दंडाचा बोजा पडू नये, यासाठी महापालिकेकडून 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी करभरणा केंद्र सुरूच ठेवली जाणार असून, महापालिकेच्या या केंद्रावर सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत रोख रक्कम, डीडी, धनादेशाद्वारे मिळकतकर भरता येणार आहे. तसेच यापुढील तीन महिनेही ही सर्व कर भरणा केंद्र सुटीच्या सर्व दिवशी सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.
1500 कोटींचा टप्पा ओलांडला
महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उत्पन्न डिसेंबरअखेर 1520 कोटींवर गेले आहे. मागील वर्षी याच कालावधीतील हे उत्पन्न 1295 कोटी होते. या उत्पन्नात शहरातून 1505 कोटी तर नवीन गावांमधून 15 कोटींचे कर संकलन झाले आहे. दरम्यान, मिळकतकर विभागास महापालिका आयुक्तांनी 2022-23 च्या अंदाजपत्रकात सुमारे 2400 कोटींची जमा गृहीत धरली आहे. मात्र, यावर्षी महापालिकेची अभय योजना नसल्याने तसेच निवडणुका तसेच इतर कामांमुळे महापालिकेच्या कर संकलन विभागास अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने पुढील तीन महिन्यांत या विभागास तब्बल 900 कोटींची वसुली करावी लागणार असून, त्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.