मुंबई – टाटा मोटर्स मधील 49 टक्के भागभांडवल परदेशी गुंतवणूकदारांना विकण्याचा कंपनी प्रयत्न करीत असल्याचे वृत्त काही वृत्तमाध्यमात फिरत आहे. टाटा मोटर्स या वृत्ताची दखल घेतली आहे आणि टाटा मोटर्स 49 टक्के भागभांडवल विकण्यासाठी कसलीही हालचाल करीत नसल्याचे सांगितले आहे.
ज्यांनी हे वृत्त प्रकाशित केले त्यांना आम्ही याबाबत सांगणार आहोत, असे टाटा मोटर्सने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. टाटा मोटर्सचे काम आमच्या पद्धतीने योग्य प्रकारे चालले आहे. त्यामुळे यातील तब्बल 49 टक्के भागभांडवल कुठल्याही युरोपियन किंवा पूर्वेकडील देशातील कंपनीला विकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
टाटा मोटर्स आपली उलाढाल वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चांगले प्रयत्न केले आहे. त्यामुळे कंपनीला भांडवल विक्रीचा काही निर्णय घेण्याची गरज वाटत नसल्याचे दिसून येते. या संदर्भात प्रकाशित झालेले वृत्त अंदाजावर किंवा कल्पनावर आधारित आहे. त्यात कसलेही तथ्य नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.