टीआरपीत अव्वल!

“तारक मेहता का उल्टा चश्‍मा’ या छोट्या पडद्यावरील मालिकेची गेल्या काही महिन्यात सातत्याने चर्चा होत आहे. याचे कारण या मालिकेतील कलाकारांचे मानधन आणि त्यांचे इन-आऊट! विशेष म्हणजे मालिकेतील बिनीच्या कलाकारांनी पाठ फिरवूनही ही सीरियल टीआरपी खेचून आणण्यात अव्वल ठरली आहे.

यावेळी सर्वाधिक टीआरपी नंबर मिळवून या मालिकेने पहिले स्थान पटकावले आहे. कुंडली भाग्य, ये रिश्‍ता क्‍या कहलाता है, कुमकुम भाग्य यांसारख्या आघाडीच्या मालिकांबरोबरच केबीसी आणि कपिल शर्माच्या शोलाही “तारक मेहता…’ने मागे टाकले आहे. आजवर या मालिकेने टॉप 10, टॉप 5 मध्ये नेहमीच स्थान मिळवले आहे, पण यावेळी पहिला क्रमांक पटकावून मालिकेतील कलाकारांनी सर्वांनाच अचंबित केले आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही भागांपासून दयाच्या पुनरागमनाविषयी सातत्याने बोलले जात होते, हायलाईट केले जात होते. प्रत्यक्षात मात्र दयाचे पुनरागमनही पोपटलालचा विवाह आणि दयाच्या आईला दाखवण्याच्या प्रसंगासारखेच ठरले. दयाचे पुनरामन होणार याची चर्चा ज्याप्रमाणात झाली ती पाहता आणि प्रत्यक्षातील प्रसंग पाहता “डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखे’ ठरले.

अशा ट्रिक्‍समुळे पहिला क्रमांक पटकावता येत असेलही, पण मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या-चाहत्यांच्या भावनांशी केलेला तो खेळ ठरतो. जर दयाच्या भूमिकेसाठी दिशा वकानी मालिकेत पुनरागमन करण्यास इच्छुक नसेल आणि तिच्या मागण्या पूर्ण करण्यास मालिकेचे निर्माते असीत मोदी असमर्थ ठरत असतील तर मग दयाची इतक्‍या प्रदीर्घ काळ प्रतीक्षा का केली जात आहे? वास्तविक, दया-दिशा दोन वर्षांपासून मालिकेत नसूनही टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका चांगल्या स्थानावर पोहोचते आहे, याचाच अर्थ मालिका, टीम आणि प्रेक्षकांपेक्षा कोणीही मोठे नसते!

Leave A Reply

Your email address will not be published.