भोरच्या भूमीतील समाजसेवेचा तारा ध्रुव प्रतिष्ठान

पुणे – भोर तालुक्‍याची राज्याच्या नकाशावर दुर्गम आणि आदिवासी तालुका म्हणून ठळकपणे नोंद आहे. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव शंकर केळकर यांनी ग्रामविकासाचा पाया भक्‍कम केला. त्यांनी आरोग्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात वंचित राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणले. 

गेल्या 19 वर्षांत ध्रुव प्रतिष्ठानची व्याप्ती आता राज्यासह देशभरात पोहोचली आहे. या परिश्रमामागे केळकर यांचा ध्यास आणि सर्व घटकांतून त्यांच्यासाठी दातृत्वाची ओंजळ रिती करणाऱ्या दानशूर व्यक्‍तींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हातभार असल्याने ध्रुव प्रतिष्ठानची कीर्ती सर्वदूर पोहोचली आहे. दैनिक “प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त ध्रुव प्रतिष्ठानचा घेतलेला आढावा…

भोर तालुक्‍यातील टिटेघर गावचे पूर्वी इनामदार असलेले हे केळकर कुटुंब पहिल्यापासूनच आदर्शवत्‌ म्हणून तालुक्‍यात परिचित आहे. राजीव शंकर केळकर यांचे शिक्षण सातवीपर्यंत टिटेघरातच जिल्हा परिषद शाळेत झाले. रावडी येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी वयाच्या विशीतच बॅण्ड पथकात बेंजो वाजवण्याचे काम केले. सुसंस्कृत घराण्यातील मुलगा हे काम करतो म्हणून अनेकांनी त्यांना हिणवले.

मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्यात सामाजिक उर्मी आणि समाजाप्रती आपुलकी असल्याने ते कधीही ध्येयापासून विचलित झाले नाहीत. मित्राच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी त्यांनी एक रुपयाचे तिकीट विकून 22 हजार रुपये जमा करून मित्राची ऍडमिशन फी भरली होती. हलाखीत असताना त्यांनी डोक्‍यावर चप्पल आणि चुली घेऊन गावोगावी विक्री केली होती. मात्र, त्यांच्यात कमीपणाची कोणतीही जाणीव नव्हती. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करणे हा माझा पगार आहे, ही भावना आजही त्यांच्यात ठायी ठायी आहे.

वास्तववादी जीवन जगताना त्यांनी तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी वास्तववादी जीवन जगताना तळागाळापर्यंत कष्टकरी, आदिवासी जनतेसाठी आयुष्य खर्ची घातले आहे. केळकर यांनी पहिल्यांदा तालुक्‍यात शिक्षण क्षेत्रात काम करण्यास प्रारंभ केला. तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या.त्यामुळे अनेक होतकरू मुले शिक्षणापासून वंचित राहात होती. त्याचा परिणाम कुटुंबावर होत होता. हलाखीतील कुटुंबांची भावी पिढी सक्षम व्हावी, यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. केळकर यांनी गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, दप्तरे जमा करून देत होते.

त्यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, नीरा-देवघर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सढळ हाताने मदत केली. त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला. 2005 मध्ये विद्यार्थी पालक योजना सुरू केली. योजनेत होतकरू मुलांचा शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला. ज्यांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्या मुलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. आदिवासी, कातकरी समाजातील ही मुले विद्यार्थी-पालक योजनेतून उच्चशिक्षित बनली. यामध्ये रवींद्र नवगणे हा विद्यार्थी डॉक्‍टर बनला. निलेश भोईटे हा विद्यार्थी डीएडचे शिक्षण घेऊन खासगी क्‍लासेस चालवतो. समीर आणि आमीर पवार हे अभियंता आहेत. यातील समीर पवार हा लोणंदमधील जापनीज कंपनीमध्ये काम करीत आहे. राहुल तळेकर विद्यार्थी मुख्य प्रवाहात आला आहे.

नऊ वर्षांत संपूर्ण आवाका कवेत आल्यानंतर केळकर यांनी 10 ऑक्‍टोबर 2010 मध्ये ध्रुव प्रतिष्ठानची स्थापना केली. त्यानंतर त्यांची खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी सुरू झाली. त्यांनी अनाथ मुला- मुलींचे पालकत्व स्वीकारून नात्याचा बंध घट्ट केला. यात आदिवासी भागातील आरती शिंदे हिने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन क्रीडा स्पर्धेत राज्य पातळीपर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शिकणारी आरती हिने डोंगर दऱ्यातील पायवाट तुडवत शिक्षणाची वाट चोखाळली आहे. केळकर यांनी टिटेघर येथे अनाथ मुलांसाठी माणुसकी आणि मायेची देऊन त्यांच्यासाठी आधारवड बनले आहेत. ते अकरा मुले आणि मुलींचा सांभाळ करीत आहेत. गावकऱ्यांच्या सहभागातून तरुणांसाठी व्यायामशाळा उभारली. केळकरांना कुस्तीची आवड असल्याने तालीम उभारली. मुक्‍त संगणक केंद्र सुरू केले. मोफत वाचनालय सुरू केले.

वाचनालयात सहा हजार पुस्तके उपलब्ध आहेत. शिक्षणाचा गंध नसणाऱ्या डोंगरी भागात त्यांनी वाचनसंस्कृती रुजवली आहे. 2200 लोकसंख्या असलेल्या टिटेघरमध्ये दत्तक शाळा हा उपक्रम सुरू केला. यासाठी त्यांनी जिल्हा परिषद शाळेची निवड केली. शाळेत वर्गखोल्यांची रंगरंगोटी इमारतीचे बांधकाम, संगणक लॅब, स्मार्ट टीव्ही, विद्यार्थ्यांना ड्रेसकोड आदी सुविधा दिल्याने शाळेची गुणवत्ता वाढली. गुणवत्ता वाढल्याने शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. दुर्गम भागात आरोग्याच्या समस्या आवासून उभ्या होत्या. त्यामुळे लोकांची आरोग्य संपदा कुपोषित झाली होती.

दुर्गम भागातील सर्पदंश, प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलांना उपचारांसाठी नेण्यासाठी वाहतूक दळणवळणाच्या सुविधाअभावी अनेकांना प्राणास मुकावे लागत होते. यानंतर त्यांनी आरोग्य क्षेत्राकडेही लक्ष दिले. करोनाच्या साथीवेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक रुग्णवाहिका आणि एक कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णांसाठी मोफत सुरू केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी कात्रज रोटरी क्‍लबच्या वतीने 50 गायी देण्यात आल्या. यातून महिलांना अर्थकारण उमजले. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू झाला. गोधडी उद्योगातून महिलांना स्वावलंबी बनवले. या गोधडी सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. गरजू महिला आणि मुलींना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. 

लॉकडाऊनमध्ये तमाशा कलावंतांच्या रोजगाराच्या वाटा खुंटल्या होत्या. त्यामुळे केळकर यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून 68 महिला व पुरुष कलावंतांना धान्य किट आणि 10 हजार रुपयांची मदत दिली. तमाशा व्यवसायातील अनेक महिला चरितार्थासाठी अन्य व्यवसाय करीत होत्या. त्या महिलांना आधार देण्यासाठी भाऊबीज साडी आणि किराणा किट दिले. कृषीविकासाचा पाया हा राज्य आणि देशाचा कणा आहे, या उदात्त हेतूने कृषी अवजार पेढी निर्माण केली. अल्पभूधारक, शेतकऱ्यांना त्यांनी मोफत अवजारे दिली. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, दुग्धव्यवसाय, प्रक्रिया, पूरक जोडधंद्यासाठी कार्यशाळा घेतली.

त्यांनी शेतकऱ्यांमध्ये ऊर्जितावस्था आणल्याने भोर तालुक्‍यात आधुनिक तंत्रज्ञानाची बीज रूजविले. पी. एन. गाडगीळ अँड सन्सचे मालक अभय गाडगीळ यांच्या माध्यमातून गावाचा पाया विकासात्मक दूरदृष्टीने झेपावला. गाडगीळ यांनी गावात वृक्षारोपण, सुसज्ज शौचालय, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची टाकी, शाळेसाठी पायाभूत सुविधा देऊन ग्रामीण भागातील गावकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा दिल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ही जळमटे दूर करण्यासाठी त्यांनी गावागावांत जनजागृती मोहीम उघडली. महिला बचत गटाच्या माध्यमातून मास्कची निर्मिती केली. भोर पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क देऊन संपूर्ण इमारत सॅनिटायझरिंग केली. रेनकोट दिले आहेत.

आपुलकी, मैत्रीपूर्ण नाते
सामाजिक, शिक्षण, आरोग्य, राजकीय, क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांनी आपुलकी, मैत्रीपूर्ण नाते ठेवले आहे. त्यांच्या कार्याला पाठिंबा मिळत असून प्रतिष्ठानच्या कौतुकाचा दरवळ राज्यभरात पसरला आहे. माजी मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्रामदादा थोपटे, माजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, शिवसेनेचे केदार देशपांडे, “चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता निलेश साबळे, अभिनेता प्रशांत दामले, आनंद अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, विद्या बाळ, समाजवादी नेते भाई वैद्य, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गणिततज्ज्ञ अच्युत गोडबोले, वनराईचे चेतन धारिया, कासुर्डी येथील टेक्‍नो फोर कंपनीचे प्रवीण ढोले पाटील, अमेरिकास्थित आरती अनावकर, विराज अनावकर, अभय गाडगीळ, चिंतामणी केळकर, किशोर केळकर, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, पंचायत समितीचे मुख्याधिकारी विशाल तनपुरे, भोरच्या नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, पंचायत समितीचे सभापती श्रीधर केंद्रे, भोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भगवान काकणे, उपअधीक्षक डॉ. आनंद साबणे, गटशिक्षणाधिकारी अश्‍विनी सोनवणे (केळकर), राघवेंद्र कुलकर्णी आदींचे सहकार्य मिळत आहे. अनलॉकमध्ये 45 शाळा सुरू झाल्यानंतर वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, मास्क दिले. ऑक्‍सिमीटर, थर्मामीटर दिले. समाजभान जपत प्रतिष्ठानने कार्याची उंची वाढवली आहे.

आरोग्यसेवेसाठी सढळ मदत
तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 200 वाफेचे मशीन दिले आहेत. पीपीई किट दिले. करोनाच्या साथीवेळी मृत्यू हा भयानक होता. अंत्यविधीसाठी कोणी जवळचा नातेवाईक येत नव्हता. मात्र, प्रतिष्ठानच्या वतीने करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्‍तीचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानने माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती दिली. तालुक्‍यातील चार कोविड सेंटरमध्ये सलग चार महिने मोफत सुमारे चारशे अंडी आणि 15 लिटर दुधाचा रतीब घातला आहे. प्रतिष्ठानने गरजू कुटुंबांना बाराशे किट दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावावरून आलेल्या लोकांसाठी छावणी उभारली. करोनाच्या साथीत प्रशासनातील अधिकारी हे करोना योद्धा आहेत. या भावनेतून भोर उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांसाठी साहित्य दिले. रुग्णालयात 90 हजार रुपयांची औषधे, वाफेचे मशीन, ऑक्‍सिजन मास्क देण्यात आली.

शब्दांकन – भुजंगराव दाभाडे भोर

तालुका प्रतिनिधी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.