खाऊ खुशाल “वाजे वडापाव’

पुणे – महाराष्ट्राच्या खाद्यपरंपरेचा आढावा घेताना वडापावचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. वडापावची रेसिपी सर्वसाधारणपणे सारखीच असली तरी जशी दर पाच मैलांवर भाषा बदलते, तशी प्रत्येक नाक्‍यावरच्या वडापावची चवही बदलते. धावपळीच्या वेळी चटकन भूक भागविणारे. मात्र, आता वडा राज्याच्या कानाकोपऱ्यात अगदी खेडोपाडीही पोहोचला आहे. प्रत्येक ठिकाणची चव वेगवेगळी असते. कारण भाजी बटाट्याची असली तरी त्यातील मसाले मात्र वेगवेगळे असतात. त्यामुळे कोणत्याही गावी गेल्यावर खवय्ये तेथील लोकप्रिय वड्याची चव आवर्जून पाहतात. 

वाजेवाडी (ता. शिरूर) येथील दादा वाजे यांनी तर झणझणीत आणि अस्सल ग्रामीण भागील चवीचा वडपावचा थेट “ब्रॅन्ड’च तयार केला आहे. त्यामुळे पुणे-नगर महामार्गावर जा-ये करणारा तसेच आसपासच्या परिसरातील मंडळी “वाजे वडेवाले’ दुकानासमोर थांबून वडापावची चव चाखतात आणि सोबत पार्सलही घेऊन जातात. परिसरातील अनेकजण तर खास वडापाव खाण्यासाठी वाजेवाडीची सैरही करतात. अस्सल आणि झणझणीत “वाजे वडेवाले’ “ब्रॅन्ड’ सोबतच आता ग्राहकांना खास वाजे “गुळा’च्या “चहा’ची चव मिळत असल्याने वड्यासोबतच आता वाजे गुळाचा चहाही ब्रॅंड होणार यात तिळमात्र शंका नाही.

वाजेवाडी या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील दादा वाजे या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोणतेही पाठबळ नसताना वाजेवाडी येथे स्वतःचा “वाजे वडेवाले’ या बॅनरखाली व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला आपल्या व्यवसायाला जम बसेपर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाही. जिद्दीने व्यवसाय करत ग्राहकांचे हित दादा यांनी जपले. “वाजे’ वडापावाची चव ग्राहकांच्या जीभेवर रेंगाळत राहिल्याने अल्पावधीतच पुणे-नगर महामार्गावरील “वाजे वडेवाले’ एक “ब्रॅन्ड’ च झाला.

दादा वाजे यांच्या प्रेमळ स्वभावाने असंख्य नागरिक, ग्राहकांसोबत परदेशी पाहुणेदेखील जोडले गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी “वाजे वडेवाले’ नाव पाहताच नागरिक गर्दी करीत असतात. विशेष म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये ग्राहकांना एकच चव मिळत असल्याने ग्राहकदेखील समाधान मानत आहेत. ग्राहकांचे हित आणि पदार्थाची “चव’ ग्राहकांच्या जीभेवर रेंगाळली पाहिजे यासाठी जेही कष्ट करावे लागतील ते करण्यास नक्‍कीच अग्रभागी राहील आणि ग्राहकांचे समाधान त्यात आमचे समाधान हेच “ब्रीदवाक्‍य’ उराशी बाळगून दादा वाजे हे यशाची शिखरे पादाक्रांत करतील यात तिळमात्र शंका नाही.

“वाजे वडापाव’सोबत ग्राहकांना लाल, हिरवी, पांढऱ्या अशा पाच प्रकारच्या चटण्या मिळत असल्याने वडापावची चवच निराळी लागले. त्यामुळे एक वडापाव खाल्ल्यावर ग्राहकांना दुसरा वडापाव खाण्याची इच्छा मारता येत नाही, हे मात्र निश्‍चित! अनेक ग्राहक तर थेट “वाजे वडापाव’ म्हणजे एकावेळचे जेवण असेच म्हणून लागले आहेत.

अन्‌ “ब्रॅन्ड’ सर्वत्र पसरला

एकीकडे अशा पद्धतीच्या व्यवसायात मोठी स्पर्धा सुरू झालेली असतानाच त्यांनी स्वतःचा वाजे वडेवाले या नावाने ब्रॅंड निर्माण केला. त्यानंतर ग्राहकांच्या आग्रहानुसार “दादा’ यांनी एक पाऊल पुढे टाकत सणसवाडी येथे शाखा उभारली. त्यानंतर रांजणगावकरांच्या आग्रहाखातर रांजणगाव गणपतीनगरीत आणखी एक शाखा थाटली. यामुळे दादांचा “ब्रॅन्ड’ तालुकाभर पसरला तर चवीमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.