मुंबई – अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तानाजी’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. थोरा-मोठ्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी सर्वच स्तरावरून केली जात होती. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागणीवर शिक्कामोर्तब करीत ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास मान्यता देण्यात आली.
तान्हाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. इतिहासावर आधारीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सदर लढाईवरील ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या चित्रपटासाठी चित्रपटगृहांनी तिकिटदरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) प्रेक्षकांकडून वसूल न करता चित्रपटगृहाने स्वत: राज्य शासनाच्या तिजोरीत भरण्याचा निर्णय झाला. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून 30 एप्रिल 2020 पर्यंतच्या कालावधीतील तिकिट विक्रीवरील राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा देण्यास मान्यता देण्यात आली.