मुंबई : बंडखोर आमदारांच्या विरोधात आज शिवसैनिक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. काळया रंगाच्या शाईने गद्दार असे देखील लिहिण्यात आले होते. त्यानंतर तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘औकातीत राहा, तिढा सुटल्यावर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे.
पुण्यातील बालाजी नगर भागात सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यालय आहे. या कार्यालयाला शिवसैनिकांनी लक्ष्य केलं. या तोडफोडीनंतर तानाजी सावंत यांनी फेसबुकवर पोस्ट करून शिवसैनिकांचा इशारा दिला.ते म्हणाले , आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा का हा राजकीय तिढा सुटला की येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर दिलं जाईल. माझी नम्र विनंती आहे. प्रत्येकानं आपल्या औकातीत राहावं असे तानाजी सावंत यांनी म्हंटले आहे.