पौड, (वार्ताहर) – घोटावडे (ता. मुळशी) येथील जय सुचंद्रिका मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ‘जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग व भजन’ कार्यक्रम उत्साहात पार पडल्या. या तालुकास्तरीय स्पर्धेत पुरुष व महिला आशा एकूण पस्तीस संघानी सहभाग घेतला.
तालुकास्तरावर क्रमांक पटकाविणार्या संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल स्थानी येणार्या भजनी मंडळाला दीड लाखांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. भजन व अभंगांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विविध सामाजिक विषयांबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ‘पाणी वाचवा व स्वच्छता’ या विषयावरील सादरीकरण करून ही प्रबोधनात्मक भजन स्पर्धा पार पडली.
शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष माजी सभापती महादेव कोंढरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, बाळासाहेब गोडांबे, विलास अमराळे आदी उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेसाठी नियुक्त केलेले स्पर्धा प्रमुख पं. रघुनाथ खंडाळकर, समन्वयक विवेक थिटे, संदीप राक्षे, स्पर्धेचे मुळशी तालुका संयोजक बाबाजी शेळके व सोमनाथ साठे यांनी नियोजनबद्ध ही स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेचे परीक्षक तबला वादक रामदास भोयर व सुप्रसिद्ध गायिका ज्योती गोराणे यांनी परीक्षण केले.
स्पर्धेतील बक्षीसपात्र संघांची नावे पुढीलप्रमाणे ः संत सेवा भजनी मंडळ, भूकूम (प्रथम). श्रीराम भजनी मंडळ कोळवली व श्री विठ्ठलराज रूक्मिणी भजनी मंडळ, असदे (द्वितीय). उत्तेजनार्थ – राजमाता महिला भजनी मंडळ चांदे, क्रांती महिला भजनी मंडळ हिंजवडी, जोगेश्वरी महिला भजनी मंडळ माण, राम कृष्ण हरी महिला भजनी मंडळ धुमाळवाडी, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ बोतरवाडी व सावता महाराज भजनी मंडळ लवळे यांना अनुक्रमे गौरविण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता आणि पाणी वाचवा या विषयांवर सादरीकरण करून ही स्पर्धा नियोजित वेळेत पार पाडली. जागतिक तापमानात बदल होत असल्याने ऋतूचक्र बदलत चालले आहे. पर्यायाने पाऊसही कमी होऊन सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या प्रश्नाबर पाण्याची बचत हा एक प्रमुख उपाय आहे व तो आपण सर्वांनी अंमलात आणायला हवा. -बाबाजी शेळके, मुळशी तालुका अध्यक्ष वारकरी सेवा संघ