चिंचवड – प्रतिभा महाविद्यालयातील प्रतिभा फिनिशिंग स्कूल व प्लेसमेंट सेल या विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात कुशलता निर्माण करणे, अनुभव मिळावा. पदवी घेतानाच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी नऊ प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व कंपन्यांसमवेत सामंजस्य करार लिखित स्वरूपात करण्यात आला.
टेक्व्यू इन्फोटेक प्रा.लि.- अर्जुन वडगावे, मेगा कॉर्पसोल – किरण उंबरदंड, प्रथम फाऊंडेशन – केतन साठे, पोर्टल विंझ सोल्युशन – श्रेयश कुलकर्णी, आयुष सर्व्हिसेस – अरुण वासंगकर, पी.एस.पी.आय.पी. असोसिएट्स प्रा.लि. – ऍड. सूर्यकांत पाटील, आर.एस.एल.प्रा.लि. – रूपेश मुनोत, इन्पीव्हरीटाज – अरुण मोरे, स्कील ऍकॅडमी – महेश कोल्हे विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे प्रमुख व कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा म्हणाले, विविध शाखेत विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच त्यांना त्याच्या आवडत्या क्षेत्रातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणवत्तेला वाव मिळावा, त्याचबरोबर पदवीग्रहण करतानाच विद्यार्थी एक परिपूर्ण संस्थेतून बाहेर पडावा, यासाठी विविध शाखेत शिक्षण घेत असलेला प्रत्येक विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, औद्योगिक आदी क्षेत्रातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव तज्ज्ञाकरवी प्रशिक्षण स्वरूपात देण्याचा मुख्य उद्देश आहे.
डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सचिन बोरगावे, प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, प्रा. गुरूराज डांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रमुख डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी माहिती सांगून आभार मानले.