भुईंज – वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील यांच्या वाढदिनी उद्या, दि. 29 रोजी मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात शिंदे यांनी म्हटले आहे की, किसन वीर कारखाना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, मिरज येथील सेवासदन, लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि शेंद्रे (ता. सातारा) येथील ऑन्को लाइफ कॅन्सर हॉस्पिटल यांच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर मोफत महाआरोग्य शिबिर, रक्तदान, मोफत मोतिबिंदू निदान शिबिर, नेत्र तपासणी आणि अल्पदरात चष्मे वाटप सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत होणार आहे. जिल्हा बॅंकेमार्फत वाई येथील सोनगीरवाडी विभागीय कार्यालयातील लक्ष्मणराव पाटील सहकार सदनात सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत मोफत महाआरोग्य शिबिर होणार आहे. यामध्ये ईसीजी, मधुमेहाबाबत मार्गदर्शन, इन्शुलिन व्यवस्थापन, इन्शुलिन बंक, मधुमेह आहारतज्ज्ञांचा सल्ला, गरोदरपणात मधुमेहाचे व्यवस्थापन, डायबेटिक फूट क्लिनिक, थायरॉइड तपासणी, रक्तगट, रक्तातील साखर तपासणी होणार आहे.
सनी चव्हाण मित्र परिवारातर्फे सिद्धनाथवाडी (वाई) येथील अंबिकामाता मंदिरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत महाआरोग्य शिबिर होणार आहे. यामध्ये मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप, रक्तदात्यास आकर्षक भेट, रक्तदाब, साखर तपासणी, अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास ईसीजी काढण्याची सोयही करण्यात आली आहे. या शिबिरांचा लाभ वाई पंचक्रोशीतील लोकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
आमदार मकरंद पाटील हे रविवारी (दि. 29) सकाळी 10.30 वाजेपर्यंत सातारा येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार आहेत. त्यानंतर 11.30 वाजता वाई येथील पोस्ट ऑफिसजवळ श्रीकांत सावंत मित्र परिवाराच्या संकल्पनेतून “सन्मान माझ्या नेत्याचा’ या कार्यक्रमांतर्गत आमदार मकरंद पाटील यांच्या भव्य भित्तीचित्राचे अनावरण होणार आहे. यावेळी आमदार मकरंद पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चना पाटील उपस्थित राहणार आहे. जिल्हा बॅंकेच्या विभागीय कार्यालयातील आणि सिद्धनाथवाडीतील अंबिकामाता मंदिरातील महाआरोग्य शिबिरास आमदार मकरंद पाटील दुपारी 12 वाजता भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता किसन वीर कारखाना कार्यस्थळावरील गळीत हंगाम शुभारंभास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमानंतर आमदार मकरंद पाटील हे तेथे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.