अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राष्ट्रीयकृत बॅंकांना सुचना
नवी दिल्ली : राष्ट्रीयकृत बॅंकांनी त्यांच्या ज्या अधिकाऱ्यांवर गैरव्यवहारांचे आरोप आहेत त्या आरोपांची चौकशी करून त्यांच्यावरील प्रलंबीत कारवाईची प्रक्रिया त्वरीत पुर्ण करावी अशी सुचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. येत्या एक जानेवारीपासून विशिष्ठ पेमेंटवर लागू असलेले मर्चंट डिस्काऊंट रेट्स रद्द करण्यात येतील असेही त्यांनी जाहीर केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांसमवेत आज अर्थमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मर्चंट डिस्काऊंट रेट चार्जेस रद्द करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्याची सुचना त्यांनी बॅंक अधिकाऱ्यांना केली.
या आढावा बैठकीत बॅंकांच्या प्रमुखांनी त्यांच्या कामांचा आढावा अर्थमंत्र्यांना सादर केला. पण त्यात अधिकाऱ्यांनी नेमकी सरकारकडे काय मागणी केली वगैरे तपशील मात्र जाहींर झालेला नाही. ज्या बॅंक अधिकाऱ्यांवर गैरप्रकारांचे आरोप आहेत त्यांच्यावरील कारवाईची प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्याची सुचना अर्थमंत्र्यांनी या बैठकीत केल्याचे सांगण्यात आले.