मोगॅडिशु : सोमालियाच्या राजधानीत गजबजलेल्या भागात एका चेकपॉईन्टवर शनिवारी सकाळी गनिमांनी कार बॉंम्बचा स्फोट घडवला. त्यात किमान तीस जण ठार झाले असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. स्फोटात 60 हून अधिक जण जखमी झाले असून त्यातील अनेकांची हालत नाजूक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या राजधानीच्या शहरात अलिकडच्या काळात झालेला हा पहिलाच मोठा हल्ला आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की मोगॅडिशु शहराच्या ज्या चेकपॉईन्टवर हा हल्ला झाला त्या भागात एक सरकारी टॅक्स कलेक्शन सेंटर होते त्यावर हल्ला करण्याच्या इराद्याने हा हल्ला करण्यात आला.
सकाळच्यावेळेत या गजबजलेल्या भागात महिला आणि मुलांचीही वर्दळ मोठी होती. त्यातील अनेक जण या हल्ल्यात बळी पडले किंवा जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गनिमी संघटनेने स्वीकारलेली नाही. पण या भागात अलकायदाशी संबंधीत अल शबाब ही संघटना कार्यरत असल्याने त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असावा असे मानले जात आहे.
तथापी हा गट कधीही कोणत्याही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत नाही. सोमालियाच्या दक्षिण आणि मध्य भागातील बऱ्याच भागावर अलशबाब संघटनेचे वर्चस्व आहे.