मुंबई – मुंबै बँकेचे संचालक प्रवीण दरेकर यांच्यावर फौजदारी संहितेनुसार कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
प्रवीण दरेकर यांना सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधकांनी 3 जानेवारी 2022 रोजी मजूर म्हणून अपात्र घोषित केले आहे. प्रविण दरेकर हे मजूर या संवर्गाची अर्हता धारण करत नाहीत. तथापि ते मागील अनेक वर्षांपासून संचालक व अध्यक्ष म्हणून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काम करत आहेत.
प्रविण दरेकर यांनी फसवणूक करुन सदस्यता मिळवलेली असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 78 अ नुसार ते पुढील एक वर्षासाठी कोणत्याही प्रवर्गातून सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र ठरत नाहीत. त्यामुळे प्रविण दरेकर यांनी केलेल्या फसवणुकीसाठी त्यांच्यावर भारतीय फौजदारी संहितेमधील कलम 199, 200, 420 व 37 तसेच अन्य उचित कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी पत्रात केली आहे.
तसेच या पत्राच्या प्रती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिल्या आहेत.