पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्तांची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा रक्षकांची ठेकेदार कंपनीकडून आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे या कंपनीवर तातडीने कडक कारवाई करावी. सुरक्षारक्षकांचे थकित वेतन विनाविलंब अदा करण्याचे आदेश द्यावेत. यापुढे सर्व सुरक्षारक्षकांचे वेतन ठरलेल्या वेळेत मिळेल याची महापालिकेने व्यवस्था करावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे.
यासंदर्भात आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, दवाखाने, उद्याने, कार्यालयांची सुरक्षा करण्यासाठी एका खासगी कंपनीला कोट्यवधींचे काम देण्यात आले आहे. या खासगी कंपनीने कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. त्याचे पैसे महापालिका वेळेच्या वेळी ठेकेदार कंपनीला देत आहे.
पण ठेकेदार कंपनीमार्फत सुरक्षारक्षकांना दरमहा वेळेवर वेतन दिले जात नाही. गेल्या तीन महिन्यांपासून हे वेतन थकित आहे. त्याचप्रमाणे मार्च 2021 ते मार्च 2022 या कालावधीतील भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कमही क्रिस्टल कंपनीने सुरक्षारक्षकांच्या खात्यात जमा केली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ठेकेदार कंपनी सर्व सुरक्षारक्षकांना कामगार कायद्यांतर्गतचे
कोणतेही लाभ देत नाही. नियमानुसार वेतनवाढही करत नाही.
ही ठेकेदार कंपनी महापालिकेसोबत झालेल्या करारातील अटींचे कोणत्याही प्रकारचे पालन करत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सुरक्षारक्षकांना कामगार कायद्यांतर्गत असलेले लाभ व रखडलेले वेतन करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या क्रिस्टल कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी. सुरक्षारक्षकांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे. तसेच यापुढे त्यांना दरमहा वेळेवर वेतन मिळण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून तातडीने कार्यवाही व्हावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.