पिंपरी -यंदा सण, उत्सवाची मोठी धूम असून गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याची मंडळांची तयारी जोरदार तयारी सुरू आहे. सामाजिक, राजकीय, पौराणिक, प्रबोधनपर हलते अन् स्थिर देखावे उत्सवात पाहायला मिळणार आहेत. मूर्तीकारांची तयारी अंतिम टप्प्याकडे आली आहे. वाढत्या महागाईचा त्यांनाही फटका बसत आहे.
गेली दोन वर्षे करोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. मात्र, यंदा निर्बंध हटले असून त्यानिमित्ताने कारागिरांनाही थोडाफार आर्थिक हातभार लागणार आहे. त्यामुळे कारागिरांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, वाढत्या महागाईचे त्यावर विरजन पडले आहे.
गेल्या काही वर्षांची परंपरा जोपासात मूर्तीकारांनी देखावे तयार केले आहे. ऐतिसाहिक, सामाजिक, पौराणिक आणि धार्मिक विषयांवरील हलत्या देखाव्यांची गणेश मंडळांकडून बुकिंग सुरू झाले आहे.
काही मंडळे स्वतः देखाव्याची संकल्पना सांगून ते तयार करून घेत आहेत. तसेच गणेशोत्सवासाठी स्थिर देखाव्यांनाही प्रतिसाद मिळत आहे. काहींनी भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, करोना योद्धा आदींवर देखाव्यांना मागणी आहे. गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांनी हलत्या देखाव्यांसाठी बुकिंग सुरू केले आहे. चार फायबर पुतळ्यांचा समावेश असलेल्या देखाव्यांचा सेट किंमत 15 ते 20 हजार आणि पुतळ्यांची संख्या वाढली तर सेटची किंमतही वाढते.
कासारवाडी येथील मूर्तीकार रमण कारंडे म्हणाले की, एका देखाव्यासाठी सेटमध्ये चार ते दहा पुतळ्यांचा समावेश आहे. प्रत्येक पुतळ्याला देखाव्यांच्या विषयांप्रमाणे साजेशा वेशभूषा, आभूषणे तयार केले जातात. तसेच त्या मूर्तींची सजावट केली जाते. यंदा नवीन जास्त मूर्ती तयार केल्या नाहीत. मागणीनुसार करणार आहोत. महागाईचा जास्त फटका बसला आहे.
तीन ते चार महिने तयारी
गणेशोत्सवापूर्वी तीन ते चार महिन्यांपासून देखावे तयार करण्यासाठी काम कारागिर करतात. शहरात मोजकेच मूर्तीकार आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता मागणी आसल्यास देखावा तयार करून देण्याचे काम करत आहेत. वाढती महागाई आणि मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता मागणीनुसार देखावे तयार करून दिले जात असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.
गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि गणेश विर्सजन मिरवणुकीसाठीच्या रथावर यंदा स्थिर देखाव्यांसाठीही मागणी असते. यंदा आम्ही पौराणिक, ऐतिहासिक देखावे तयार केले आहेत. जास्त देखावे तयार करणार नाही. कारण महागाईचा फटकाही बसला आहे.
– रमण कारंडे, मूर्तीकार, कासारवाडी