नवी दिल्ली – तैवानला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपात अनेक इमारती आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. भूकंपामुळे झालेल्या पडझडीत ७ जण ठार झाले आहेत.
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे शाळा रिकाम्या करण्यात आल्या. तर जुन्या इमारतींची पडझड झाली. हुआलेन कौंटीतील एक पाच मजली जूनी इमारत थोड्यावेळाने तब्बल ४५ अंशांपर्यंत तिरकी झाली आणि पहिला मजला कोसळला. अचानक रस्ता खचल्यामुळे झालेल्या अपघातात ७ जण ठार झाले आहेत. पडझडीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ७३६ जण जखमी झाले आहेत. तर ढिगार् यांखाली ७७ जण गाडले गेले असल्याचे सरकारी आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
भूकंपामुळे आणि नंतर आलेल्या आफ्टरशॉकमुळे २४ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर ३५ रस्ते खचले आहेत. काही पूल, बोगदे आणि भुयारी मार्गांचेही नुकसान झाले आहे.
या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती, असे तैवानच्या भूकंप मापन केंद्राने म्हटले आहे. तर यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेच्या म्हणण्यानुसार भूकंपाची तीव्रता ७.४ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलेन पासून १८ किलोमीटर दक्षिण-नैऋत्येला भूगर्भात ३५ किलोमीटरवर होता. भूकंपाच्या मुख्य धक्क्यापाठोपाठ अनेक आफ्टरशॉक जाणवले. भूकंपानंतर लगेचच त्सुनामी लाटांचा इशाराही देण्यात आला होता. मात्र कालांतराने हा इशारा मागे घेण्यात आला. ४ रिश्टर क्षमतेच्या आणखीन एका भूकंपाचा इशाराही देण्यात आला होता. आफ्टरशॉकच्या शक्यतेमुळे भुयारी रेल्वेसेवा काही काळ स्थगित केली गेली. मात्र रेल्वे मार्ग विस्कळीत झालेले असल्यामुळे रेल्वे पुन्हा सुरू केली जाऊ शकली नाही.
१९९९ च्या भूकंपात सर्वात जास्त हानी…
हुआलेन प्रांतात यापूर्वी २०१८ मध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी एक ऐतिहासिक हॉटेल आणि इतर काही इमारती कोसळल्या होत्या. तैवानमधील आतापर्यंतचा सर्वात भीषण भूकंप २१ सप्टेंबर १९९९ रोजी आला होता. ७.७ क्षमतेच्या या भूकंपात २,४०० जण ठार झाले होते. तर १ लाख लोक जखमी झाले होते आणि हजारो इमारतींचे नुकसान झाले होते.