IPL Live Cricket Score, DC vs KKR Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 च्या 16 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. दिल्लीने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवत संघ विजयी मार्गावर परतला. त्याचबरोबर कोलकाताने आत्तापर्यंतचे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. हे आव्हान दिल्लीसाठी सोपे नाही.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2024 च्या 16 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने विशाखापट्टणममध्ये प्रथम खेळून धावांचा डोंगर उभा केला. केकेआरने 20 षटकांत सात विकेट गमावत 272 धावा केल्या. दिल्लीसमोर 273 धावांचे मोठे लक्ष्य आहे. एकूण 272 ही आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. कोलकाताच्या डावात एकूण 22 चौकार व 18 षटकार आले.
या मोसमात आयपीएलची सर्वात मोठी धावसंख्याही झाली. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध (27 मार्च) 277 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, एकूण T20 मध्ये ही आठव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. 272 धावा ही कोलकात्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्याने पंजाबविरुद्ध सहा विकेट्सवर 245 धावा केल्या होत्या.
Ladies & gentlemen, cue the drum roll for our highest #TATAIPL score! 🥁🔥 pic.twitter.com/VYaXT15VIP
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 3, 2024
कोलकाताचा डाव….
सुनील नरेन आणि फिलिप सॉल्ट यांनी सामन्याची झंझावाती सुरुवात केली. त्यानी पहिल्या विकेटसाठी 4.3 षटकांत 60 धावा जोडल्या. नॉर्टजेने ही भागीदारी तोडली. त्याने सॉल्टला (18) बाद केले. यानंतर नरेनने 18 वर्षांचा युवा भारतीय फलंदाज अंगक्रिश रघुवंशीसह चौकार आणि षटकार ठोकले. या दोघांनी 48 चेंडूत 104 धावांची भागीदारी केली.
नरेनने आयपीएल कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूंत सात चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. त्याला मार्शने बाद केले. त्याचवेळी, अंगकृश रघुवंशीने आयपीएलमध्ये पदार्पण करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 27 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यर 11 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. तर नरेन-रघुवंशीनंतर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी तुफानी खेळी खेळली.
रिंकू आठ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. कोलकात्याच्या डावातील 20 वे षटक टाकण्यासाठी इशांत शर्मा आला आणि त्याने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रसेलला शानदार यॉर्कर टाकून क्लीन बोल्ड केले. या यॉर्करवर रसेलचा तोल गेला आणि तो पडला. त्याने 19 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर इशांतने रमणदीपला पायचीत केले. त्याला दोन धावा करता आल्या.
व्यंकटेश अय्यर पाच धावांवर तर स्टार्क एका धावेवर नाबाद राहिला. इशांतने 20 व्या षटकात केवळ आठ धावा दिल्या. दिल्लीकडून नॉर्टजेने 4 षटकात 59 धावा देताना तीन बळी घेतले. तर, इशांतने दोन विकेट घेतल्या. इशांतने 3 षटकात 43 धावा दिल्या. खलील आणि मार्शला प्रत्येकी एक विकेट मिळाली. खलील यानं 4 षटकात 43 तर मार्शनं 3 षटकात 37 धावा दिल्या. याव्यतिरिक्त रसिख डार सलामने 3 षटकात 47 धावा, सुमित कुमारने 2 षटकात 19 आणि अक्षर पटेलनं 1 षटकात 18 धावा दिल्या. या तिघां गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही.