वॉशिंग्टन – मूळ पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक तहव्वूर राणा याला भारताच्या सूचनेनुसार अमेरिकेने पुन्हा अटक केली आहे. त्याचा सन 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे, असा भारताचा दावा असून त्याला भारताच्या हवाली केले जावे, अशी मागणी भारताने अमेरिकेकडे केली आहे. त्यानुसार त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. राणा हा अमेरिकेच्या कोठडीत होता. तथापि त्याला करोनाची बाधा झाल्यामुळे त्याने कोर्टाकर्ड अर्ज करून आपल्या सुटकेची विनंती केली होती. त्यानुसार सहानुभूतीच्या आधारे त्याला कारागृहातून नुकतेच सोडण्यात आले होते. पण त्याला ताब्यात देण्याची विनंती भारताने केल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्याच्या संबंधात अमेरिकन सरकार 26 जूनला कोर्टात आपली भूमिक सादर करणार आहे त्यानंतर त्याच्या विषयीचा निर्णय होणार आहे.
दहशतवादी कारस्थानात सहभाग
26/11 संबंधी अमेरिकेत चालवल्या गेलेल्या खटल्यामध्ये तहव्वूर राणाला दोषी ठरवले गेले होते. मात्र 2011 मध्ये झालेल्या खटल्यात 26/11 च्या हिंसाचाराशी राणाचे थेट संबंध जोडणाऱ्या दहशतवादाचे आरोप सिद्ध केले जाऊ शकले नव्हते. 26/11 च्या कारस्थानामध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून तहव्वूर राणाला 14 वर्षांची शिक्षा सुनावली गेली होती. भारतावरील हल्ल्यासाठी पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेला शस्त्रास्त्रे पुरवल्याच्या आरोपात त्याला दोषी ठरवले गेले होते. याशिवाय 2005 मध्ये प्रेषितांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र छापणाऱ्या एका दानिश वर्तमानपत्रावरील हल्ल्याचा कट करण्यासाठीही राणाला दोषी ठरवले गेले. या वर्तमानपत्राच्या कार्यालयावरच्या हल्ल्याच्या कटाप्रमाणे प्रत्यक्ष हल्ला होऊ शकला नव्हता. याशिवाय मित्र डेव्हिड कोलमन हेडलीला मुंबईमध्ये शिकागोस्थित इमिग्रेशन विधी व्यवसायाची शाखा उघडण्यास परवानगी दिल्याचाही आरोप राणावर होता. या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून हेडलीला डेन्मार्कमध्ये प्रवासाला परवानगी मिळाली होती. हेडलीने भारतात प्रत्यार्पण झाल्यावर फाशीची शिक्षा टाळण्यासाठी माफीचा साक्षीदार होण्याचे कबूल केले होते. त्यात त्याने राणाच्या दहशतवादी कृत्यांबाबतची माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात सुटका होईपर्यंत तो लॉस एंजेलिसमधील फेडरल कारागृहातच होता.