कराड (प्रतिनिधी) – येथील तडीपार गुंड रोहित रमेश कारंडे (वय 24 रा. चांभार गल्ली, कराड) याने गुरुवार पेठेत बुधवारी (दि. 27) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यश ऊर्फ निखिल गणेश कारंडे (वय 18, रा. गुरुवार पेठ, कराड) याच्यावर चाकूहल्ला केला.
यामध्ये निखिल हा जखमी झाला आहे. याप्रकरणी रोहित कारंडे व त्याचा साथीदार आतिश लादे (रा. लादे गल्ली, बुधवार पेठ, कराड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यश कारंडे व त्याचा मित्र सोमनाथ कारंडे हे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास रस्त्यावर उभे असताना, रोहित व आतिश तेथे आले. त्यांनी यशला मारहाण केली. त्याला सोडवायला सोमनाथ पुढे आला असता, त्याला आतिशने मारहाण केली.
तुला जिवंत ठेवणार नाही. मी तडीपार असल्याची माहिती पोलिसांना देतोस काय, असे म्हणत रोहितने यशला चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोहितला ताब्यात घेतले असून, आतिशचा शोध सुरू आहे.