या आधी ‘यांना’ देखील सुनावली गेली प्रतिकात्मक शिक्षा

सरन्यायाधीश शरद बोबडे नागपूरमध्ये एका आलिशान मोटारसायकलीवर बसल्याचे छायाचित्र आणि सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांच्या भूमिकेबाबत प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्वीटची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच दखल घेऊन सुनावणी घेतली आणि त्यामध्ये प्रशांत भूषण दोषी असल्याचे आढळून आले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना माफी मागण्याचा पर्याय दिला होता. मात्र भूषण यांनी त्यास नकार दिल्याने न्यायालयाने त्यांना एक रुपया दंडाची शिक्षा ठोठावली.

या आधी देखील विविध न्यायालयांमध्ये अशा प्रकारे प्रतिकात्मक शिक्षा सुनावली गेली आहे. 

अरुंधती रॉय – नर्मदा धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात आदिवासींनी सुरू केलेल्या नर्मदा बचाव आंदोलनात बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका आणि कार्यकर्त्या अरुंधती रॉय सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी न्यायालयाचा हक्कभंग केल्याच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. या प्रकरणात रॉय यांना तिहार तुरुंगात एक दिवसाची साधी कैद आणि 2000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. नर्मदा धरणाच्या विरोधातील आंदोलन न्यायालय धाक दाखवून रोखत असल्याचे रॉय यांनी म्हटले होते. या विधानाबद्दल रॉय यांनी खेद किंवा पश्चात्ताप व्यक्त करण्यास नकार दिल्याने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात त्यांचे वकील म्हणून प्रशांत भूषण यांनी काम केले होते.

युसुफ रझा गिलानी – पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे जुने प्रकरण उघडण्यास नकार दिल्याने त्यावेळचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांना सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने गिलानी यांना कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा दिली होती. ही शिक्षा सुनावण्यात आली आणि तीस सेकंदातच कोर्टाचे कामकाज संपले. त्यामुळे गिलानी यांना फक्त तीस सेकंद उभे रहावे लागले.

ईएमएस नंबुद्रीपाद – 1970 मध्ये नंबुद्रीपाद केरळचे मुख्यमंत्री असताना त्यांनी म्हटले होते की, मार्क्स आणि एंजल्सच्या मते न्यायव्यवस्थेचा वापर दमन करण्यासाठीचे साधन म्हणून केला जातो आणि न्यायाधीश वर्गाविषयी पूर्वग्रह ठेवून काम करत असतात. कोर्टाचा हक्कभंग केल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयानेही हा निकाल कायम ठेवला फक्त दंडाची रक्कम कमी करून प्रतिकात्मक 50 रुपयांचा दंड ठोठावला. एम. हिदायतुल्ला त्यावेळी सरन्यायाधीश होते.

जेफ्री आर्चर – बेस्टसेलर लेखक जेफ्री आर्चर यांना 1987 मधील डेली स्टारविरोधातील बदनामीच्या खटल्यात जुलै 2001 मध्ये शिक्षा झाली. तुरुंगात असतानाच त्यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागला. तुरुंगातील अनुभवांवर ए प्रिझन डायरी ही तीन भागांची मालिक लिहिण्याचे नियोजन त्यांनी केले होते. त्यावेळी अन्य सहकारी कैदी आणि त्यांचे गुन्हे उघड न करण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना कोणतेही भत्ते न देता दोन आठवडे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याकाळात तुरुंगातील कँटीनमधून खरेदी करता येणार नाही, असेही सांगण्यात आले होते.

करकोच्याची शिकार – कर्णकर्कश्श ओरडणआऱ्या करकोच्या शिकार करणाऱ्याला केवळ एक डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. अमेरिकेच्या उत्तर भागात हा पक्षी आढळतो आणि तो नष्ट होण्याच्या धोकादायक स्थितीत असल्याने त्यांची संख्या वाढवण्यासाठी अमेरिकेत लाखो डॉलर खर्च केले जात आहेत. या पक्षांना पकडून त्यांचे ब्रीडींग करून पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात येते. एक करकोचा प्रौढत्वापर्यंत वाढवण्यासाठीचा खर्च सुमारे 1,10,000 डॉलर इतका येतो. 2011 मध्ये एका करकोच्याची तरुणाने शिकार केली. त्याबद्दल न्यायलयाने त्याला सुनावणीचे शुल्क म्हणून 550 डॉलर भरण्यास सांगितले आणि शिक्षा म्हणून 1 डॉलरची दंड ठोठावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.