बाजार नियमन मुक्त करण्याची दि पुना मर्चंट्स चेंबरची मागणी
पुणे – बाजार समितीच्या आवारातील शेतमाल नियमनमुक्त करा, देखरेख शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी मार्केट यार्डातील गुळ-भुसार व्यापाऱ्यांनी मंगळवारी (दि.25) लाक्षणिक बंदचे आवाहन केले आहे.
भुसार बाजारातील दि पुना मर्चंट्स चेंबरने पुकारलेल्या बंदला श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने पाठींबा दिला आहे. मात्र, फळ-भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील व्यवहार नियमित सुरू राहणार आहे.
बाजार आवाराबाहेरील शेतमाल विक्री व्यवहारांवर नियमन राहणार नाही. मात्र, बाजार आवारात शेतमाल विक्रीवर नियमन राहणार आहे. केंद्र सरकारने बाजारही नियममुक्त करावा, यासाठी हा बंद पुकारल्याचे चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल आणि सचिव विजय मुथा यांनी सांगितले.
भाजीपाला नाशवंत आहे. एकदिवस जरी बाजार बंद ठेवला तरी नुकसान होते. त्यामुळे बाजार सुरू ठेवण्यात येणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.