दुर्ग – महादेव बेटिंगॲप घोटाळ्यातील आरोपीच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गावात ते मृतावस्थेत आढळून आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सुशील दास असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या प्रकरणातील आरोपी असीम दास यांचे ते वडील होत. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुशील दास यांचा मृतदेह मंगळवारी आंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अछोटी गावातील विहिरीत आढळून आला आहे.
एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सुशील दास हे रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.