मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आता चार महिने लोटली आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून पोलिसांकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.
दरम्यान सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात सोशल मीडियावर विविध भाष्य करण्यात आली. त्याच्या चाहत्यांपासून तर अनेक राजकीय पक्षांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार वर ताशेरे ओढले.
मात्र अशाप्रकारे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर केलेली टीका एका युट्यूबरला चांगलीच महागात पडली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधील राशिद सिद्दीकी या युट्यूबर विरोधात एफआयआर दाखल केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, राशिदने बनावट कंटेट पब्लिश करून फक्त 4 महिन्यात 15 लाख रुपयांची भरभक्कम कमाई केली आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात फेक स्टोरी आणि व्हिडीओ पोस्ट करणे, मानहानी, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणे असे आरोप राशिद सिद्दीकीवर करण्यात आले आहेत. पोलिसांनी बदनामी, सार्वजनिक गैरवर्तन आणि हेतूपूर्वक अपमान केल्याच्या आरोपावरून राशिद सिद्दीकी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.