भारतीय क्रिकेटमधील मर्यादित षटकांच्या फॉरमॅटचा बादशहा बनलेल्या सूर्यकुमार यादवला आज प्रत्येकजण ओळखतो. काही काळापूर्वी कोणालाही माहिती नसलेला हा खेळाडू असा चमकतोय जसे की तो या संघात खूप वर्षांपासून खेळतोय. मात्र, उशिरा संघात खेळण्याची संधी मिळालेल्या सूर्यकुमारने अत्यंत कमी कालावधीत टी-२० फॉरमॅटच्या क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. सध्या तो जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज बनला आहे. त्याच्या खेळण्याच्या कौशल्यामुळे त्याला भारताचा ३६० डिग्री खेळाडू, असेही म्हटले जात आहे. दरम्यान, सूर्यकुमारने भारताचा सध्याचा कर्णधार रोहित आणि माजी कर्णधार विराटबाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सूर्यकुमार म्हणाला की, “विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळाल्याने मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो. या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून जे काही साध्य केले आहे, ते मला कधी साध्य करता येईल हे मलाही माहीत नाही. अलीकडे, मी विराट भाईसोबत काही चांगल्या भागीदारी रचल्या आहेत आणि मला विराटसोबत फलंदाजी करण्यात खूप आनंद मिळाला आहे. रोहित माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. कठीण प्रसंगात मी नेहमीच त्याची मदत घेतो. आयपीएल 2018 मध्ये मुंबई संघामध्ये सामील झाल्यापासून तो मला चांगले मार्गदर्शन करत आहे.”
सूर्यकुमार यादवने 2022 या वर्षभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्याच्या फलंदाजी कौशल्यामुले त्याला एबी डिव्हिलियर्सप्रमाणे ३६० डिग्री खेळाडू म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकात भारतासाठी विराट कोहलीनंतर सूर्यकुमारने सर्वाधिक धावा काढल्या होत्या. त्याने २०२२ या वर्षात 31 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 1164 धावा केल्या आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादवने १८७.४३ स्ट्राईक रेटने आणि ४६.५६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतकांचा तर 9 अर्धशतकांचा समावेश आहे.