जयपूर – पक्षांतर गटबाजीमुळे घुसमट होत असल्याचा आरोप करत बंड पुकारलेल्या सचिन पायलट यांनी आज आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या वक्तव्याबाबत आता काँग्रेसचे जेष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना, ‘पायलट यांनी भाजपचा पाहुणचार त्यागून स्वगृही परतावे’ असे मार्मिक आवाहन सुरजेवाला यांनी केले.
सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांना भाजपशासित हरियाणा येथील एका हॉटेलमध्ये ठेवले गेल्याची चर्चा आहे. यावरूनच सुरजेवाला यांनी हा टोला लगावला. यावेळी बोलताना त्यांनी, ‘पायलट यांनी हरियाणा पोलिसांच्या संरक्षणात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांची सुटका करावी.’ असं आवाहन देखील केलं.
पक्ष नेतृत्वाकडून पायलट यांच्याशी अनेकवेळा संवाद साधला गेल्यानंतरही पायलट व इतर काही आमदार पक्षाच्या विधिमंडळ बैठकीस उपस्थित राहिले नाहीत.
तत्पूर्वी काल काँग्रेसतर्फे पायलट यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. असं असलं तरी पायलट यांनी स्वगृही परतावं असे आवाहन पक्षातर्फे वारंवार करण्यात येत आहे.
दरम्यान, पायलट यांनी पुकारलेल्या बंडानंतर राजस्थानातील राजकीय तिढा सोडवण्याची जबाबदारी सुरजेवाला यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सुरजेवाला हे सध्या राजस्थानात तळ ठोकून असून तेथील काँग्रेस सरकार सुस्थितीत ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.