नवी दिल्ली – गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अटक झाल्यापासून तुरुंगात असलेले केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पान यांना आजारी आईशी संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च न्यायलयाने परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने कप्पान यांना ही सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.
कप्पान यांची आई आजारी असून त्यांना आपल्या मुलाशी संवाद साधायचा आहे. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना आपल्या मुलाशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका केरळमधील पत्रकार संघटनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
कप्पान यांच्या आई बहुतांश काळ बेशुद्धच असतात. जेंव्हा त्या शुद्धीवर असतात, तेंव्हा त्यांना आपल्या मुलाला बघायचे असते. त्यांना जिवंतपणी आपल्या मुलाला बघता यावे, यासाठी ही सुविधा द्यावी, अशी मागणी पत्रकारांच्या संघटनेच्यावतीने ऍड. कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केली होती.
उत्तर प्रदेशातील हाथरस इथे सामूहिक बलात्कार प्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी दिल्लीवरून गेलेल्या कप्पान आणि अन्य तिघांना संशयास्पद व्यक्ती म्हणून पोलिसांनी अटक केली होती.
त्यांच्याविरोधातील आरोपपत्रामध्ये दहशतवादी कृत्यासाठी निधी संकलन करण्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेंव्हापासून कप्पान आणि इतर उत्तर प्रदेशातील मथुरेतील तुरुंगात आहेत.