मिर्झापूर या वेबसिरीजचा दुसरा सिक्वेन्सदेखील लोकप्रिय झाला. मात्र आता या वेबसिरीजच्या निर्मात्यांपुढे वेगळीच समस्या येऊन ठेपली आहे. या वेबसिरीजच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या वेबसिरीजमध्ये रसिका दुग्गलने रंगवलेल्या बीना त्रिपाठीच्या व्यक्तिरेखेवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. या रोलमध्ये केवळ अश्लीलता दर्शवण्यात आली आहे. अशा प्रकारच्या रोलच्या प्रतिमेवर बंदी असायला हवी, असा दावा एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेमध्ये केला गेला आहे. याच याचिकेवरून न्यायालयाने निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.
याचिका दाखल करणारे वकिल मिर्झापूर जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. बीना त्रिपाठीचा रोल ज्या पद्धतीने मांडला गेला आहे, त्यावरून मिर्झापूरमधील महिलांची बदनामीच होते आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. विशेषतः बीना त्रिपाठीचे तिच्या सासऱ्याबरोबर असलेले अनैतिक आणि तिच्या घरातील नोकराबरोबरही अनैतिक संबंध दर्शवणे खूपच लज्जास्पद असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
अशाप्रकारे महिलांचे किळसवाणे चित्रण केल्यामुळे सांस्कृतिक मूल्यांची हेळसांडच होत असल्याने निर्माते आणि दिग्दर्शकांना याबाबत कडक समज देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली गेली आहे. काही दिवसांपूर्वी ‘मिर्झापूर’विरोधात आणखी एक याचिका दाखल झाली होती. मिर्झापूर जिल्ह्याची बदनामी या वेबसिरीजने केली असल्याची तक्रार मिर्झापूर जिल्ह्यातील एका रहिवाशाने जिल्हा न्यायालयात केली होती.