मोदींच्या छळामुळे सुषमा स्वराज-जेटलींचा मृत्यू झाल्याच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल

उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस ;उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास कारवाई होणार

नवी दिल्ली : दिवंगत भाजपा नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचे निधन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छळामुळेच झाला. असा गंभीर आणि खळबळजनक आरोप द्रमुकचे प्रमुख एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसापूर्वी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. त्यासाठी आयोगाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलेला दबाव आणि होणारा छळ सहन न झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असे वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते. या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. निवडणूक आयोगाने स्टॅलिन यांना बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या आधी उत्तर देण्यास सांगितले आहे. स्टॅलिन उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास कारवाई केली जाईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने आमच्याकडे २ एप्रिलला तक्रार केली असून उदयनिधी स्टॅलिन यांनी ३१ मार्चला एका रॅलीत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला छळ आणि दबावामुळे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य केल्याचे सांगितले आहे. स्टॅलिन यांनी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले होते की, “सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला”. उदयनिधी स्टॅलिन यांनी यावेळी पंतप्रधान पक्षातील वैंकय्या नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत असल्याचे म्हटले. “तुम्ही सर्वांनाच बाजूला केलं. मिस्टर मोदी, मी ई पलानीस्वामी नाही जो तुम्हाला घाबरेल आणि तुमच्यासमोर झुकेल. मी उदयनिधी स्टॅलिन आहे,” असे यावेळी ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.