मुंबई -विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशन याच्यावर बोचरी टीका केली आहे. किशनला सातत्याने उसळत्या चेंडूंचा फटका बसला आहे. अनेकदा तो याच चेंडूंवर बाद झाला आहे. काही सामन्यात तर तो असे चेंडू खेळताना घाबरलेला वाटला. जर एखाद्या फलंदाजाला अशा उसळत्या चेंडूंची भीती वाटत असेल तर तो फलंदाजच नाही, असे परखड मत गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईने आठ सलग पराभव स्वीकारले. या सामन्यांत इशानची केवळ दोन अर्धशतके आहेत. या सर्व लढतींत तो ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहता त्याची देहबोलीच नकारात्मक असल्याचे दिसून आले. छातीपर्यंत उसळणारे चेंडू खेळताना त्याची त्रेधातिरपीट होत असल्याचेही दिसून आले. खेळपट्टीवर उभा राहिलेला असताना तो अशा चेंडूंवर सातत्याने गोंधळत होता. केवळ बाद झाल्यावरच आपली यातून सुटका होईल अशीच त्याची अपेक्षा असावी हे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहताना दिसून येत होते, असेही गावसकर म्हणाले.
एका धावेची किंमत 7.66 लाख
इशान किशनला मुंबईने 15.25 कोटी रुपयांना आपल्या संघासाठी खरेदी केले. त्याने आतापर्यंतच्या आठ सामन्यांतून अवघ्या 199 धावा केल्या आहेत. म्हणजेच त्याची एक धाव 7.66 लाख रुपयांना पडल्याचे दिसून येत आहे.
एखाद्या फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागतो आणि तो स्लीपच्या दिशेने जातो, तेव्हा प्रत्येक फलंदाज चेंडू स्लीपमध्ये क्षेत्ररक्षकाने झेलला आहे का हे पाहत असतो. इशान मात्र ही गोष्ट करताना दिसला नाही. पंचांनी बाद देण्यापूर्वीच इशान हा मैदानातून निघून जाण्याच्या तयारीत होता. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरही त्याला चांगली कामगिरी करता येत नव्हती. तो खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्नच करताना दिसला नाही, असेही गावसकर यांनी नमूद केले.
इशान जेव्हा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये क्रिकेट खेळायला जाईल तेव्हा त्याला या समस्या निश्चितच जाणवतील. त्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाज त्याला जास्तीत जास्त उसळते चेंडू टाकतील. त्यामुळे इशानला या गोष्टीचे उत्तर शोधावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. किशनने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळताना अवघ्या 28.43 च्या सरासरीने 199 धावा
केल्या आहेत.