नवी दिल्ली -रोहित शर्माची फटकेबाजीतील सुरम्यता आणि सूर्यकुमार यादवचे तेजस्वी फटके; फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांच्या आक्रमकतेचा विचार करायचा झाल्यास उद्या (शनिवारी) येथे होणारा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमधील सामना म्हणजे वर्चस्वाची लढाई असणार आहे.
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळविल्यानंतर अनुक्रमे एमआय आणि सीएसकेची लढत सुरू होईल आणि दोन्ही संघ विजयी मालिका सुरू ठेवण्यास उत्सुक असतील. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या खेळीने (117 धावा) मुंबईकरांच्या गोटात जरा जास्तच सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय मुंबईची मधली फळीही फॉर्मात आल्याने मुंबई मोठी धावसंख्या उभारण्याची आशा बाळगून आहे.
सूर्यकुमार यादवने मालिकेत 170 धावा केल्या असून, आता तोही भरात आला आहे. तर त्याला क्रुणाल पंड्या समर्थ साथ देत आहे. केरॉन पोलार्डनेही उपयुक्त खेळी करत 81 धावा करताना आपला दर्जा आणि उपयुक्तता सिद्ध केली. त्याचबरोबर अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही कमी चेंडूंत 36 धावा ठोकत संघाला सुस्थितीत नेले.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये अपवादात्मक ठरले आहेत आणि सीएसकेच्या फलंदाजांना हाणामारीच्या षटकांत रोखून धरण्याची क्षमता बाळगून आहेत. राहुल चहर 11विकेट्ससह एमआयचा प्रमुख विकेट-टेकर गोलंदाज ठरला आहे. तथापि, त्याला क्रुणाल व अनुभवी ऑफस्पिनर जयंत यादव यांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. आता मुंबईला हे ठरवायचे आहे की, नाथन कोल्टर-नाईलला कायम ठेवायचे की इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये परत आणायचे. तसे झाले तर पोलार्डला गोलंदाजी करावी लागेल.
सलामीवीर डु प्लेसिसच्या 270 धावा आणि ऋतुराज गायकवाडच्या 192 धावा असल्याने दोघेही अव्वल फॉर्ममध्ये आहेत आणि संघाला अजून मजबूत सुरुवात करून देण्यास उत्सुक आहेत. मधल्या फळीतील मोईन अलीने (88 धावा)पिंच-हिटरच्या भूमिकेशी चांगलेच जुळवून घेतले आहे, तर सुरेश रैनाही उत्तम कामगिरी करत आहे. अंबाती रायडू आणि रवींद्र जडेजा फलंदाज म्हणून भलतेच आक्रमक झाले आहेत आणि मागणीनुसार षटकार खेचू शकतात. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि इंग्लिशचा सॅम कुरन केव्हाही हल्ला करू शकतात.
दीपक चहर आणि कुरन यांच्या नेतृत्वात सीएसकेच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी बजावली आहे, तर शार्दुल ठाकूर भागीदारी तोडण्यात निर्णायक ठरू शकतो. जडेजाने पाच विकेट्स आणि मोईनने चार विकेट्स घेऊन चमक दाखविली असून, सर्वांना मुंबईविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः फिरोजशाह कोटला स्टेडियम, नवी दिल्ली
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर