सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात रविवारी पाच जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच, सोमवारी (दि. 21) जिल्ह्यात आणखी पाच जणांनी आपले जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.
साताऱ्यातील तामजाईनगरात सहयोग कालनीतील डॉ. कविता विश्वासराव भंडारे (वय 59) यांनी घरातील सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अरुण ठोके (रा. सदरबझार) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात खबर दिली.
कराड शहरातील अक्षय धनंजय भोसले (वय 24, रा. मुक्ताइ अपार्टमेंट, शुक्रवार पेठ) याने इमारतीच्या टेरेसवरील बीमला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची खबर गणेश भोसले (रा. शुक्रवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली.
तिसरी घटना सातारा तालुक्यातील शेळकेवाडीत घडली. बाळू पांडू पवार (वय 55, मूळ रा. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. शेंद्रे, ता. सातारा) यांनी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर अशोक राठोड (वय 35, रा. विजापूर) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.
शुभम पद्माकर आडके (वय 24, रा. साईश्रद्धा अपार्टमेंट, मुंढे, ता. कराड) याने घरातील बेडरूममध्ये फॅनच्या हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
जयसिंग गुलाबराव जगताप (वय 70, रा. माळेगाव बुद्रुक, जि. पुणे) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची खबर पोलीस पाटील हणमंत धुळाजी सोनवलकर (वय 50, दुधेबावी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.